नव्या तंत्रज्ञानाचा आणि नव्या पद्धतींचा वापर करून शेतकरी आपली शेती कशी अधिक फायदेशीर बनवू शकतात याचे उदाहरण म्हणजे युवा शेतकरी वसंत जयवंत गोरड.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधील गोरडवाडी गावातील बी . ई . सिव्हिल इंजिनीअरचे शिक्षण घेतलेले वसंत जयवंत गोरड यांनी त्यांच्या शेतीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग घेतले आहेत. सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी.ई. केले असतानाही त्यांना नोकरीमध्ये जास्त काही आवड नसल्यामुळे त्यांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला आणि अनेक नव्या पद्धतींचा अवलंब करायला सुरवात केली. त्यातील एक प्रयोग म्हणजे २०२२ साली, त्यांनी आपल्या जमिनीवर ऊसाचे पीक प्रति एकर सरासरी ९३ टनाने घेतले, जे खरोखरच उल्लेखनीय आहे.
त्यांनी आपल्या ११ एकर जमिनीवर ऊस, आंबा, पेरू, नारळ यांची लागवड करून उल्लेखनीय उत्पन्न घ्यायला सुरवात केली. शेती मध्ये मनुष्यबळ मिळत नसल्यामुळे काहीतरी आपण मार्ग काढून शेती फायदेशीर बनवली पाहिजे असे त्यांना नेहमी वाटायचे. फळभागेत यशस्वीरित्या आंतरपीक घेऊन चांगला नफा मिळवला. त्यांच्या शेतात ७.५ HP चा सौर ऊर्जा पंप बसवल्यामुळे शेतीत क्रांती झाली व तसेच मानवी श्रम खूप कमी झाले असे ते सांगतात. ते सौर पंप मोबाइल वरून नियंत्रित करतात त्यामुळे त्यांना आणि शेतकऱ्यांना शेतात सुद्धा जावे लागत नाही, ज्यामुळे बराचसे कष्ट आणि वेळ वाचतो. ते त्यांच्या सगळ्या ११ एकर शेतीला ठिबक सिंचन (स्प्रिंकलर) पद्धत वापरून सिंचन करतात, ज्यामुळे पाण्याचा वापरही कार्यक्षमतेने होतो.
वसंत गोरड यांनी फक्त आपल्या शेतातच नव्हे तर त्यांच्या गोरडवाडी गावातील आणि बाहेरच्या वेगवेगळ्या गावातील (अगदी नाशिक, नंदुरबार पर्यंत) इतर ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळवून देण्यास मदत केली आहे.
सौर ऊर्जा पंपांच्या वापराचे काही महत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
उर्जेची बचत: सौर ऊर्जा पंप सौर ऊर्जा वापरतात, ज्यामुळे वीजेचा वापर कमी होतो.
कमी खर्च: सौर ऊर्जा पंपांची स्थापना खर्चिक असली तरी त्यानंतरच्या देखभाल खर्चात बचत होते.
पर्यावरणपूरक: सौर ऊर्जा स्वच्छ आणि हरित ऊर्जा स्त्रोत असल्याने पर्यावरणास हानी पोहोचत नाही.
आधुनिक तंत्रज्ञान: सौर ऊर्जा पंप आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात.
ग्रामीण भागात विजेचे वेळापत्रक कधी रात्री तर पहाटे असल्यामुळे त्यांनी त्यांचे वडिल (जयवंत महादेव गोरड) आणि आई (ताई जयवंत गोरड) यांचा संघर्ष पाहिला. या संघर्षाने प्रेरित होऊन त्यांनी सौर ऊर्जा पंपांचा वापर करण्याचे ठरवले. त्यांना त्यांच्या पत्नी भाग्यश्री खूप मोठी साथ मिळाली, ज्यामुळे त्यांनी या शेती क्षेत्रात अधिक आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
तरुणांचे शेतीकडे दुर्लक्ष: काळजीची बाब
आजच्या घडीला अनेक तरुण शेतीकडे वळत नाहीत. उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांना शेतीमध्ये करिअर करण्याची आवड कमी झालेली दिसते. त्याचे मुख्य कारण म्हणजे शेतीतील पारंपरिक पद्धती, कमी उत्पन्न, आणि कष्टाचे जीवन. पण वसंत गोरड यांची कहाणी या दृष्टिकोनाला बदलू शकते.
नव्या तंत्रज्ञानाचा आणि नव्या पद्धतींचा वापर करून शेतकरी आपले शेत अधिक फायदेशीर नक्कीच बनवू शकतात हेच इथे दिसते. त्यांच्या या यशाने इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे, कारण त्यांनी दाखवून दिले आहे की आधुनिक पद्धतींनी शेतीत यशस्वी होणे शक्य आहे.